आजच्या बातम्या
'ठाणेवैभव'ची स्थापन २५ ऑगस्ट १९७५ रोजी कै. नरेन्द्र बल्लाळ यांनी केली. युरोपातील काउंटी(स्थानिक) वर्तमानपत्रांप्रमाणे ठाण्यात वर्तमानपत्र चालेल या ठाम विश्वासाने त्यांनी महाराष्ट्र टाईम्समधील उत्तम नोकरी सोडून हे धाडसी पाऊल उचलले. मुंबईचे सान्निध्य लाभलेल्या ठाणे शहराचे वेगळेपण टिपताना नरेन्द बल्लाळ यांनी 'ठाणेवैभव' चे बस्तान बसवले. असंख्य अडचणींचा मुकाबला करीत त्यांनी आणि श्रीमती कुमुदिनी बल्लाळ यांनी 'ठाणेवैभव' चे रोप नुसते जगवले नाही तर त्याची उत्तम निगा राखून त्याला स्वत:च्या पायावर उभे केले. 'ठाणेवैभव'ने ठाणे शहर आणि जिल्ह्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि अर्थातच राजकीय व्यासपीठ म्हणून आपली ओळख निर्माण केली. सकारात्मक पत्रकारितेचे उत्तम उदाहरण म्हणून ठाणेवैभव असा लौकिक निर्माण केला.
'ठाणेवैभव'चे वासंतिक करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु केली. ती आजही दिमाखात सुरु आहे. संपादक नरेन्द्र बल्लाळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले. समाज सुरक्षा प्रबोधिनी, बस प्रवासी महासंघ, रोटरी क्लब आदी माध्यमातून 'ठाणेवैभव' ने सामाजिक बांधिलकी जपली.
कै. नरेन्द्र बल्लाळ यांचे १९९५ मध्ये निधन झाले. त्यांचा वारसा संपादक म्हणून मिलिन्द बल्लाळ समर्थपणे राबवत आहेत. चार पानी कृष्ण-धवल ठाणेवैभव नवीन संपादकांच्या नेतृत्वाखाली बहुरंगी निघत आहे. दररोज आठ पाने देऊन दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि विधायक मजकूर देऊन 'ठाणेवैभव' ने स्थानिक दैनिक म्हणून स्थान अधिक बळकट केले. 'ठाणेवैभव' ने आपला अव्वल क्रमांक सातत्याने राखला आहे. श्री. मिलिन्द बल्लाळ यांनी ठाणेवैभव वृत्तवाहिनी सुरु करून सात वर्षे केबलच्या माध्यमातून बातम्या प्रसारित केल्या. कै. नरेन्द्र बल्लाळ यांचा नर्मविनोदी लेखनाचा वारसा मिलिन्द बल्लाळ यांच्याकडे आला असून गेली ३० वर्षे दर गुरुवारी प्रसिद्ध होणारे तलावातले चांदणे सदर ते लिहित आहेत. तसेच दर सोमवारी अतिशय अभ्यासपूर्ण आणि लक्षवेधी असे 'पॉईंट ब्लँक' सदर वाचकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. या दोन्ही स्तंभाचे संकलन असलेली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. स्थानिक दैनिकांनी स्थानिक समस्यांबाबत चळवळी उभ्या केल्या तर ती स्पर्धेतही स्वत:ची ओळख निर्माण करू शकतात. श्री. मिलिन्द बल्लाळ यांनी सिटीसन्स फोरम स्थापन करून ही भूमिका निभावली. अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेत ते सक्रीय आहेत. 'ठाणेवैभव' ला समाजाने दिलेली ही जणू मान्यता आहे.
उपक्रमशीलता आणि नाविन्याचा ध्यास हा जणू 'ठाणेवैभव'चा श्वास बनला आहे. पत्रकारितेमधील तिसरी पिढीचे प्रतिनिधीत्व निखिल बल्लाळ हे समर्थपणे करीत आहेत. पत्रकारितेबरोबर मार्केटिंग आणि जाहिरात हे विषय निखिल हाताळत आहे. कार्यकारी संपादक म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून असंख्य अभिनव उपक्रम राबवून त्यांनी जी चुणूक दाखवली आहे ती पहात ठाणेवैभव कितीही आव्हाने आली तरी पेलणार असा आशावाद निर्माण झाला आहे. हे संकेतस्थळ 'ठाणेवैभव' च्या आधुनिक भवितव्याची जणू नांदी आहे. आपले 'ठाणेवैभव' परिवारात सहर्ष स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.