Marathi Newspaper
वृत्तपत्रसृष्टीची समाजाभिमुख व समृध्द परंपरा वृध्दींगत करण्याच्या उद्दिष्टांनी किसन भाऊ हासे व सुशिला किसन हासे यांनी 1989 साली साप्ताहिक संगम संस्कृती प्रकाशनास सुरूवात केली. सामाजिक बांधिलकी व परिवर्तनाच्या ध्येयाने पत्रकारिता करीत असताना पत्रकारिता तत्वाशी संलग्न राहून जीवन वाटचाल करीत असताना अनेक कठोर प्रसंगांना सामोरे जावून, नफ्या तोट्याचा विचार न करता प्रसंगी कर्ज काढून संगम संस्कृती नियमीत प्रकाशित करीत असताना 2007 साली दैनिक युवावार्ता प्रकाशनास सुरूवात केली. 10 वर्षे नियमीत दैनिक प्रकाशित करणे म्हणजे दररोजचे अग्निदिव्य सहन करून प्रकाशनाची वाटचाल सुरू आहे.
तीस वर्षे कालावधीत पत्रकारिता हेच पुर्ण वेळ कार्यक्षेत्र स्वीकारून काम करीत असताना संगमनेर तालुका पत्रकार संघ, संगम ग्रा. सहकारी पतसंस्था, संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई, संगमनेर तालुका बेरोजगार संस्था या संस्थांची अतिशय प्रयत्नपूर्वक निर्मिती करून कार्यन्वित ठेवल्या आहेत. समाजहिताची पत्रकारिता निभावताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात असताना अन्यायाविरूध्द सडेतोड लेखन केले. अनेक जीवघेणे प्रसंग सहन करून सत्याची साथ आणि सहकार्याचा हात सोडला नाही. मुलांना सुसंस्कारीत करीत असताना उच्चशिक्षित करणे, वृत्तपत्र कार्यालयास इमारत, छपाई यंत्रणा आणि कुशल सहकारी निर्माण करून वृत्तपत्र क्षेत्रात व समाजात पत्रकारितेची प्रतिष्ठा वाढविण्यात यश मिळाले आहे.
2010 पासून संगम संस्कृती व युवावार्ता ही वृत्तपत्रे वेबसाईटवर प्रकाशनास सुरूवात झाली. सलग 30 वर्षे दर्जेदार राज्यस्तरीयदिवाळी अंक प्रकाशित करीत असताना महाराष्ट्र संपादक डायरी (2007), संगमनेर-अकोले-सिन्नर टेलिफोन डिरेक्टरी (1990 ते 2005), महाराष्ट्र शेतकरी डायरी यासारखे अनेक उपक्रम राबवून समाजसंपर्कासाठी व प्रबोधनासाठी सदैव कठोर परिश्रमाद्वारे पूर्ण केले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्रे व पत्रकारांचे वीस वर्षांपासून राज्य पातळीवरील विविध संघटनांचे पदाधिकारी म्हणून कार्य करीत असताना संपादक-पत्रकार संम्मेलने, प्रशिक्षण शिबीरे, अभ्यासदौरे, मोर्चे व आंदोलने यांचे नेतृत्व करून शासन स्तरावर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. दैनिक युवावार्ता व संगम संस्कृती अद्ययावत स्वरूपात, आधुनिक तंत्रज्ञानासह यशस्वी वाटचाल करण्यासाठी संपादिका सौ. सुशिला किसन हासे, संचालक आनंद-पुजा, सुदीप-प्रियंका व आमचे सर्व सहकारी प्रयत्नशील असतो. भांडवलदार व बहुआवृत्ती वृत्तपत्रांच्या स्पर्धेत छोटी वृत्तपत्रे टिकली पाहिजेत, वृत्तपत्रसृष्टीची परंपरा वृध्दींगत झाली पाहिजे तसेच समाजाचा विश्वासू साथीदार म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण सदैव प्रयत्नशील आहोत