Agnidivya (अग्निदिव्य) - Sanjay Ashok Takade (संजय अशोक तकडे) - KavitaSagar Publication कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्त्व मांडणारा कवितासंग्रह - अग्निदिव्य कविराज संजय अशोक तकडे हे एक अत्यंत निष्ठेने लेखन करणारा, आपल्याच भावविश्वात रमणारा, जन्मदात्यांच्या ऋणानुबंधनात, भावनाविभोर होणारा कवी मनाचा मित्र मी जवळून पाहिला, अनुभवला. आपल्या मित्र परिवारात रमून काव्यनिर्मितीचा आस्वाद घेतांना स्वतःला झोकून देणारा कवी म्हणून मला परिचित आहे. त्यांच्या या दुस-या काव्यसंग्रहाची विनंती करणारा निरागस, भोळा कवी ‘संजय’ आपलेपणाचे नाते दृढ करतो तेव्हा नकार अशक्य झाला व माझी लेखणी झरू लागली. संजय तकडे यांच्या कविता विविधांगी, वेगळे विषय सहजतेने हाताळणा-या आहेत, काही कविता मातापित्यांचे ऋण व्यक्त करणा-या, काही परमेश्वराबद्दलचे प्रेम, भक्ती, श्रद्धा व्यक्त करणा-या तर काही निसर्गाचे चित्रण करणा-या तर काही आकाशात भरारी मारण्याच्या इच्छाशक्तीची आराधना करणा-या आहेत. भावी जीवनाचे स्वप्न रंगविणारा उज्ज्वल भविष्याच्या विचाराने तळमळणारा प्रेम कवीही त्यांच्या अनेक कवितेतून डोकावतो. जगणे अजूनही बाकी आहे... या कवितेतून कवीची दुर्दम्य इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास व्यक्त होतो. हा ध्यास निस्वार्थ व भव्यदिव्य असा आहे. विठूराया, वारकरी, व्याकूळ या कवितांमधून परमेश्वराशी जोडलेले नाते अखंड राहो अशी इच्छा करतानाच संसार तापातून सोडव ही विनवणी कवी करतो, त्याची विठूरायावरील श्रद्धा, भक्ती व्यक्त करताना त्यांचे भाव - अवचित आले माझ्या दारी, संत वारकरी, मजवरी संत कृपा झाली. असे होऊन जातात. जन्मदात्यांनी दिलेली शिदोरी ही सुसंस्काराचे गाठोडेच आहे, अपयशाच्या प्रसंगी दु:खीत होणारे व संकटकाळी धीर देणारी व आयुष्यभर पुरून उरणारी ही शिदोरी अमुल्य असते. शब्द महिमा, शब्द सामर्थ्य याबद्दल संत तुकोबा म्हणतात - आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्रे यत्न करू शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दचि हा देव शब्देचि गौरव पूजा करू शब्द या कवितेतून शब्द मांगल्य, शब्द प्रीती आणि शब्द महतीचा प्रत्यय येतो. मातीनेच मातेची भूमिका वठवून जगायचे कसे हे शिकवले, माती अन् नाती यांचा विसरपडू देऊ नकोस हा संदेश माती अन् नाती या कवितेमधून मिळतो. समाज जीवनाबद्दलची खंत, दु:खद संवेदना पाऊलखुणा या काव्यातून व्यक्त होते. निराशा, अपयश, सांगतांनाच आपला स्वाभिमान जपणारे कवी आपल्या व्यर्थ विचारांना झटकून समाजाशी झुंजत, अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानसागराकडे झेपावण्याची दृष्टी आपल्या पुढे ठेवतो. एकाकीपणातही आपल्या अश्रूंचीच साथ असते, दु:ख, निराशेला वाट करून देणारे अश्रूच आपले सोबती होतात, या ढोंगी, स्वार्थी जगात अश्रूच सोबतीला आहेत ते कधीही घात करीत नाहीत हे अश्रू या कवितेतून व्यक्त होते. कवीच्या मनातील उद्वेग आणणारी निराशा, त्यातून कवीने विचारलेला प्रश्न निरुत्तर करणारे आहे. ह्या गोष्टी कधी कळतील? असा खडा सवाल ते विचारतात. दुस-यांच्या भावनांशी मांडलेला खेळ त्यांच्या मोजमाप हे नात्यांचे या कवितेतील शब्दातून व्यक्त होते. कष्ट करणारे हात, निसर्गाशी एकरूप होणारे जीवन आणि खोटे नागरी जीवन यांचे वास्तव चित्रण, ख-या जीवनाचे स्वरूप आपल्या समोर उभे राहतात ते खरेपणा या कवितेतून. कर्तृत्व कष्टाविण नाही, संकटाविण मार्ग नाही, क्रियेविण यश नाही याची कबुली कवी अग्निदिव्य या कवितेतून देतांना दिसतो. समारंभ, कार्यक्रम या प्रसंगांमधून महत्व कशाचे असते हे सांगतांना कवी वक्ते-श्रोते यांच्या भावनेला स्पर्श करून त्याची आवश्यकता सोहळा या कवितेतून विशद करतो. तू नाहीस, भ्रम, स्वप्न, भ्रम, साध्य, प्रवेशद्वार, जीवनाचे पारणे, आठवणींच्या हिंदोळ्यावर इत्यादी सर्व कविता एका विशिष्ट विश्वात विहंगम करतांना दिसतात. भावभावनांचा खेळ, अहमन्यतेच्या भावातील व्यर्थता, तडजोड, सहकार्य, भावी जीवनसाथीच्या स्वागताची आतुरता, भविष्यकाळाचा वेध घेणा-या स्वप्नरंजनात रममाण होणा-या कविता रम्य वाटतात. या कवितासंग्रहाच्या निमित्ताने आपल्याच विश्वात रमणारा, शब्दांशी खेळ मांडणारा माझा कवी मित्र संजय तकडे भविष्यात यशाचे शिखर गाठील यात तिळमात्र शंका नाही. कोणाच्या आशीर्वादापेक्षा शुभेच्छांचा वर्षाव या कवीवर करावासा मला वाटतो. डॉ. सुनील दादा पाटील एक माहीर प्रकाशक त्यांच्या पाठीशी असतांना यशाचा ध्वज सदोदित फडकवीत ठेवतील हा विश्वास मनापासून व्यक्त करतो. कवी, लेखक यांचेवर आभाळाएवढी माया ‘कवितासागर’ ची राहू देत हीच मनोभावना... - प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य ज्येष्ठ लेखक - संपादक - समीक्षक संपर्क - 9766581353 · कवितासंग्रह - अग्निदिव्य · कवी - संजय अशोक तकडे · स्वागत मूल्य - 50/- · प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील · प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर · संपर्क - ०२३२२, २२५५००, ९९७५८७३५६९