समर्थांनी प्रपंच व परमार्थ या दोन्हीविषयी आपल्या ग्रंथांतून शिकवण दिली तरी त्यात दोन्हीकडे 'अभ्यास' हा महत्त्वपूर्णच ठरतो. मातृसंस्था संस्काररूपाने विद्या देते. तर गुरूसंस्था संस्काररूपाने ज्ञान देते. त्यामुळेच आपली प्रगती विद्येकडून ज्ञानाकडे होते. विद्या शिकून झाली की, तिच्या प्रकटीकरणातून ज्ञान हे सिद्ध होते. हेच शिक्षणशास्त्राचे स्वरूप व कार्य आहे. त्याचे विशेषसूत्र समर्थांनी पुढील दोन ओव्यांद्वारे यथार्थपणे प्रकट केले आहे. 'जितुके कांही आपणास ठावे । तितुके हळुहळु सिकवावे । शहाणे करुनि सोडावे । अवघे जन ॥' आणि 'अभ्यासे प्रकट व्हावे । नाहीतरी झांकोनि आसावे । प्रकट होवोनि नासावे । हे बरे नव्हे ॥' या दोन ओव्यांतून समर्थांनी चिंतन-मननलेखन- वाचन-प्रकटीकरण या सर्वांचा समावेश केला आहे. तोच मी इथे आठ लेखांतून 'शैक्षणिक-अष्टांगयोग' स्वरूपात विवरून पाहिला आहे. त्यातूनच विद्येसह ज्ञानप्राप्ती व्हावी, हेच अभिप्रेत आहे.