जसजसा काळ बदलत गेला तसे प्रवासाचे उद्देश बदलत गेले. पूर्वी भारतीयांचा प्रवास धार्मिक वृत्तीतून घडे. त्यामुळे पूर्वी तीर्थयात्रांच्या निमित्ताने सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी देशाटन घडे. पुढे विद्यार्जन, व्यवसायांचा शोध, व्यापार इ. कारणांमुळे देशाटन घडू लागले. आता विरंगुळा म्हणून, ताणतणाव दूर करण्यासाठी व मन ताजेतवाने करण्यासाठी पर्यटन करण्याकडे सर्वांचा कल वाढतो आहे. म्हणून मग धार्मिक स्थळांबरोबरच निसर्गस्थळे, थंड हवेची ठिकाणे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढते आहे. देशाटनामुळे विविध देश, प्रदेश यांचा परिचय, व्यवहारज्ञान, जीवन जगण्याची समृद्ध कला व शास्त्र समजते. व्यक्तिमत्त्व संपन्न व बोलके होते. देशाटनाने सृष्टीची रहस्ये कळतात. निसर्गात व समाजात जे काही उदंड आहे ते समजते. या सर्व फायदेशीर गोष्टीमुळे मी लिहिलेले हे पुस्तक वाचकांना, विद्यार्थ्यांना व पर्यटकांना उपयोगी पडेल व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.