"मराठी ग्रामीण कादंबरीचे अर्थनिर्णयन करतांना कादंबऱ्यांच्या संहितेमध्ये उपयोजिलेली भाषा, त्या त्या भूभागातील बोलीचे शब्दरूपे हे एक महत्त्वाचे अंग असते. कोणत्याही समाजाची बोली साहित्यकृतीत अवतरतांना आपल्या संस्कृतीत संचिताला उजागर करते. त्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक लेखनाचा प्रयत्न डॉ.ज्ञानेश्वर गवळीकर यांनी केलेला आहे. महाराष्ट्राच्या विविध भूप्रप्रदेशांची भाषा अथवा तेथील बोलीतून ग्रामसंस्कृतीचे विविध्य, चालीरीती, प्रथापरंपरा, जीवनपद्धती कशा पद्धतीने साकारतात या संबंधीच्या नोंदी करून त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ही महत्त्वाचाच आहे. सामाजिक जडणघडणीचा विचार करताना मराठी भाषक समाजातील शब्दारूपांच्या पाठीमागे उभे असणारे सामाजिक संदर्भ शोधण्याची डॉ. गवळीकर यांची दृष्टी समाजसन्मुख असल्याचे लक्षात येते, भाषाव्यवहारात असणारी सामाजिक बाजू ध्यानात घेऊन समाजभाषाविज्ञानाने दिलेली दिशा ते अधोरेखित करतात. त्याचा मागोवा घेत भाषेचे उपयोजनाची अंगे मराठी ग्रामीण कादंबरीच्या संदर्भात तपासण्यांची भूमिका डॉ. गवळीकर यांच्या अभ्यासू दृष्टीची साक्ष आहे, मराठी ग्रामीण कादंबरीच्या मूल्यमापनाची वेगळी वाट ठरावी, असे प्रतिपादन त्यांच्या लेखनातून प्रत्ययास येते. ग्रामीण कादंबरीतील व्दैभाषिकता, संमिश्र बोलीतील शब्दरूपे, लिंगभेदाची भाषा, कृशिकेंद्रित जाणीव, म्हणी वाक्याप्रचार्यांचे उपयोजन अशा अनेकविध बाबींचा पट या लेखनातून निर्देशित केला जातो भाषिक व्यवहारामांगे परिस्थितीचा असणारा संदर्भ महत्वाचा मानून डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांचे विवेचन झालेले आहे. इथून पुढच्या काळातही भाषाभ्यासाच्या वाटेवर ते रुळतील अशी अपेक्षा करून त्यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांचे हे लेखन नवोदित अभ्यासकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास बाळगता येईल. डॉ. सतीष बडवे "