आजच्या आधुनिक, जडवादी जगात नास्कितेचा, अधर्माचा व अंधश्रद्धेचा पगडा इतका वाढू लागलेला दिसतो की, श्रद्धावंतांची श्रद्धादेखील डळमळीत होऊ लागते. ऐहिक, जागतिक प्रलोभने अध्यात्म विकलांग करून सोडत आहेत. कधी कधी तर त्याला तिलांजली दिल्याचे दृष्टीस पडते. परमेश्वर, देवराज्य, शाश्वत मूल्ये, परमेश्वराने प्रकट केलेले सत्य, त्याने जगजाहीर केलेला ख-या आत्मविकासाचा मार्ग, त्याची अनाकलनीय रहस्ये, त्याचे सामथ्र्य आणि त्याची कृपा हया दिव्य, ऊर्जस्वल मूल्यांविषयी उदासनीता बळावत आहे. अशा परिस्थितीत प्रज्वलित श्रद्धा दृढ करण्याच्या, ती विकसित करण्याच्या व तिच्या आधारे संपूर्ण जीवन समृद्ध करण्याच्या उदात हेतूने प्रस्तुत लेखनाचा प्रपंच करण्यात आलेला आहे.