वाचक मित्रहो सप्रेम नमस्कार या पुस्तकरूपाने मी माझ्या जीवनाच्या आठवणी उलगडणार आहे. हे पुस्तक लिहितांना मी कोणी थोर विचारवंत नाही किंवा लेखक नाही तर पुण्याच्या एका प्रख्यात महाविद्यालयात प्राध्यापक (प्रोफेसर) आहे. आज पुस्तक लिहितांना माझे वय ४५ आहे.आतापर्यंतच्या जीवनात मला बऱ्यापैकी चांगले,वाईट अनुभव आले तशाच काही आठवणी देखील आहेत.या अनुभवांना,आठवणींना ज्या माझ्या स्मुर्तीत दडलेल्या आहेत त्यांना पुस्तकरूपी उजळणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. असे करतांना मी पुन्हा एकदा स्वतःला त्या वयात घेऊन गेलेलो आहे व त्या वयाचा अनुभव पुन्हा उपभोगतो आणि पुन्हा एकदा नवचैतन्याने उर्वरित आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास मनात निर्माण होतो. पुस्तक लिहितांना माझा उद्देश इतकाच कि मनुष्य आपल्या जीवनात सतत काम करत असतो व त्या कामाच्या वेळेस आलेले अनुभव आपल्या मनाच्या कोपऱ्यात घर करून राहतात आणि रिकाम्या वेळात आपल्या स्मरणात येतात व कोणाला तरी सांगाव्याशा वाटतात तेंव्हा मी स्वतः पुस्तक रूपाने आपल्याला उलगडत आहे. तसे पहिले तर मी माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरावलो आहे व बऱ्यापैकी वेळ मिळतो तसेच स्थरावतांना फारसे कष्ट देखील पडले नाहीत.नक्कीच नशीब किंवा दैव यांचा मला भरपूर साथ मिळाला आहे आणि कदाचित या आठवणींचा संग्रह लिहावासा वाटला. या संग्रहात माझ्या जीवनाचे अगदी बालपणापासून ते तरुणपणा,एक संसारिक व्यक्ती इथपर्यंत.हे पुस्तक वाचतांना वाचकांना आवडेल अशी आशा करतो.