आपले शरीर व मन आरोग्य संपन्न ठेवणे हाच प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. शरीर, मन व आत्मा यांचा सातत्याने चालू राहणारा क्रियाशील सहयोग म्हणजेच मानवी जीवन. स्वस्थवृत्ताचे व दिनचर्या आणि ऋतुचर्येचे नियम पाळल्याने शरीर सुदृढ व आरोग्यसंपन्न राहते. सद्वृत्ताचे म्हणजेच सदाचाराने पालन केल्याने मन आरोग्यसंपन्न होते. ध्यानाने व योगाने अध्यात्मिक प्रगती होऊन शाश्वत शांती मिळते. आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद, आयुष्याचे ज्ञान. ज्या शास्त्रात मानवी आयुष्याला व आरोग्याला उपयुक्त अशी माहिती असेल ते शास्त्र आयुर्वेदातच अंतर्भूत होते. असे प्रत्येक शास्त्र आयुर्वेदाचा अविभाज्य विभाग आहे. असा पूर्वीच्या ऋषी मुनींचा आयुर्वेदाबद्दल विशालदृष्टीकोन होता. अशा दृष्टीकोनातून विचार केल्यास होमिओपॅथी, अॅक्यूपंक्चर, आधुनिक वैद्यकशास्त्र, इलेक्ट्रोथेरपी, नॅचरोपॅथी इत्यादीशास्त्रे आयुर्वेदातच अंतर्भूत आहेत असे ध्यानात येईल. फारतर त्यांना आयुर्वेदाच्या शाखा म्हणता येईल.