अॅड्. सौ. माधुरी श्रीकांत काजवेंच्या 'मी धरा होऊनी आले' या कार्यक्रमाबद्दल मी ऐकले होते. त्या स्वतः वकील व इंजिनियर पती श्री. श्रीकांत काजवे या दोघांच्या स्वर - सुरमयी कल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झालीय. स्त्री आणि स्त्रीशक्ती या विषयी सौ. काजवेंनी लिहिलेल्या कविता, गाणी खूप छान व प्रबोधन करणा-या आहेत. त्यातूनच 'मी धरा होऊनी आले' या काव्यसंग्रहाची निर्मिती डॉ. सुनील पाटील यांच्या अथक सातत्यपूर्ण प्रयत्नातून व प्रेरणेतून झाली आणि अस्सल बावनकशी, लावण्यलेणी अशा काव्यशिल्पांची ही मांदियाळी रसिकांसमोर आली. अॅड्. सौ. काजवेंचा मुळचा पिंड हा सौंदर्यासक्त असा आहे त्यामुळे स्त्रीच्या आरसपानी सौंदर्याचं वर्णन करतांना त्या म्हणतात - 'असे नितळं नाजूक रूप आणले कुठून? शुभ्र पूनव चांदणे कसे अंगोपांगी खेळे! ओलेत्याने गेलीस का इंद्रधनुष्या खालून? पा-या सारख्या अचपळ स्त्री मनाला आवरणे - सावरणे किती कठीण आहे? दुरापास्त आहे! 'आता कशाला आवरू किती याला हाती धरू? मुळी मुठीत राहीना मन बेधुंद पाखरू' असं चित्त विभोर झालंय - 'त्या' चे 'गारुड' या नवथर शेवरीला कसे पिसे लावते? ते पुढील ओळीं मधून कळते - 'झाले गारुड हे कसे लागे कसे खुळ पिसे - पिसे' 'प्रेयसी' चे गुज सांगणारा 'वारा' खूप खोलवर कुठेतरी दुखवून (की सुखावून?) जातो - 'कुजबुज जराशी ... तो शब्द घेवूनी वारा अंतरास दुखवित होता' मृगजळ, सोनपरी या कवितांमधून 'त्यांची' तगमग, प्रेम विव्हळ भाव व्यक्त झालेत. 'येशील का?' हे आर्त विरहगीत आहे तसेच त्यांचा विरह 'फुल' या कवितेमध्ये तिच्या हृदयावरचे 'ओझे' बनून समोर येते. हे परस्परामधील 'नातं' अगदी आभाळ - मातीचं, अभंग, अनादी, अनंत असं! आणि मग तो बहुप्रतिक्षित 'मिलन - क्षण' येतो. कवयित्रीने ज्याचं वर्णन - 'जागरणाची तर बावरी, लाजरी तुझ्या बंद मिठीचा पहारा... पागोळ्याच्या टीप टीप धारा...' असं मोहकपणे केलं आहे. इथंपर्यंत अल्लड, मिलनोत्सुक अशी ती जेंव्हा 'विरहिणी' बनते तेंव्हा आर्त, व्याकूळ शब्द प्रसवतात - कुठे टाकले मला कळेना पाडाव तू तुझे?? अशी अनेक प्रश्नचिन्हे मग काळजात नांगर टाकून रुतून बसतात. भूतकाळातील सुस्वप्ने वर्णिताना अॅड्. सौ. काजवे 'सिकता' हा शब्द वापरतात. 'वाळू' म्हणत नाहीत! कारण वाळू व सिकता या मध्ये सूक्ष्म फरक आहे. 'सिकता' ही पुळणीला जास्त जवळची! सुळसुळीत रेशमी स्पर्शाची! नकळत हातातून निसटणारी ... सोनेरी क्षणांसारखी - 'ही स्वप्नांची सिकता मोहक भारी मुठीतून ओघळे भारी' त्या क्षणांच्या आठवांना हृदयाच्या गाभा-यात आता खोलवर दडपून टाकलंय, कायमचं! 'गाडली भुते मी सारी अंतरात खोल दडपुनी जणू अश्वथामा फिरतो घेऊन जखम भाळाची' असं दु:ख खूप खूप खोलवर पोचलेलं आहे... भळाळणा-या क्षतासारखं. 'बांधूनी घुंगराला नक्षत्र नाचलेलं अन खोल आत माझ्या ते दु:ख पोचलेलं' या 'गझले' मध्ये शब्दांवरचं वजन अप्रतिम तोललेलं आहे. मतल्यामध्ये जो 'दर्द' आहे. लाजवाब!! कधी कधी आपण कोण आहोत? कसे आहोत? आपल्यालाच कळत नाही. उमगत नाही. असं आपल्याचं एका मराठी 'गझल' काराने म्हटलंय - 'अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा' तसं 'मी मातीत हिरवे जीवन होऊनी रुजते कधी मातीमध्ये दगड होऊनी निजते' असा आशा - निराशेचा खेळ नियती मांडते आणि मन उद्विग्न होते त्या उद्विग्नतेत त्या लिहून जातात - 'चिरेबंदी ही मी बांधलेली कबर माझी मी खोदलेली' या तरल भाव भावना व्यक्त करतांना त्याचं सृजनशील मन 'गानकोकिळा' लतादीदींचही अचूक वर्णन करतं - 'त्रैलोक्यातून भरून वाहो अवीट ही माधुरी...' दीदी, तुम्ही ही कविता वाचायलाचं हवी... 'स्त्री भ्रूण हत्या' या विषयापासून ही त्यांनी स्वतःला रोखलेलं नाही. मुक्तपणे त्या आपले काळजाला भिडणारे व दाहक विचार मांडतात. 'आठव तू माय तुझी देई जन्म गं 'आंदण' 'कितीक प-या मखमली पंखाच्या जाहल्या बळी विषारी डंखाच्या' या विकृत, अमानवी प्रवृत्तीविरुद्धच्या 'युद्धा' चा यल्गार पुकारतांना शब्दचं जणू क्रांतीची मशाल बनून येतात. 'हवी मलाच कन्यका हो पुढे नि घे शपथ समर्थ चाल तू जरा ज्योत घेऊनी करा' तशी स्त्री युगायुगांपासून 'शिकार' बनूनच राहिलेली आहे. 'सोसले दु:ख मी शतकांच्यापासुनी मी बळीच होते...राहिले का तशीच?' असा हा अनुत्तरीत प्रश्न जणू तिच्या भाळी कायमचाच रेखलेला आहे! 'बलात्कार' ही कविता खूपच भावणारी! पत्नी की आई? या सार्वकालिक कात्रीमध्ये अडकलेल्या पुरुषाची व्यथा विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्नही सौ. काजवेंनी केला आहे. पण त्यांचा मुळचा पिंड हा सौंदर्यवादी, संवेदनशील स्त्रीचा असल्यामुळे त्या प्रकारच्याचं काव्यातच त्यांच्या प्रतिभेचा बहर जास्त खुलतो. 'आरोग्याचा दिवा स्वतःच्या आयुष्यात लावूया' असा स्त्रियांना आश्वासकं सल्ला त्यांनी 'ओवी' या काव्य प्रकारातून दिलाय. डोहाळ्याला 'दौहृद' असा संस्कृत शब्द आहे. दौहृद म्हणजे - दोन हृदयं! एक गर्भिणीचं व दुसर गर्भाचं! तुकोबा सुद्धा 'आनंदाचे डोही' मध्ये म्हणतात - 'मातेच्या आवडी गर्भाचा डोहाळा' एक स्त्रीचं ज्याचे यथार्थ वर्णन करू शकते ते - 'किती कला शिकाव्या कारागिरी मी करावी कधी संगीत गायन चित्रे कधी काढावी' 'ब्रम्हा बृहस्पती विष्णू: सोम: सुर्यस्तथाश्विनौ भगो S थ मित्रा वरुणौ वीरं ददतु मे सुतम II' अशी प्रार्थना आपल्या उदरातील गर्भासाठी गर्भिणीने करावी असं सांगतात. 'हो बृहस्पतीसम बाळ शहाणे माझे' हे 'मागणे' काही त्याहून वेगळे नाही! एकुणात स्त्री व तिचे भावविभोर मन, स्वभाव, मनोवस्था, वेदना, अपेक्षा, उपेक्षा व जबाबदारी याविषयी आशयघन शब्दामध्ये साकार झालेली आणि कधी कधी लावण्यलेणी बनलेली अशी कविता या संग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध होतेय. शेवटी स्त्री शक्तीची जाणीव, स्वत्वाचा हुंकार या अक्षर शिल्पांमध्ये सुयोग्यरित्या कोरलेला आहे - तू चक्र जीवनाचे नवजन्म धरिसी उदरी ... जयघोष आसमंती जय हो नारी... जय हो नारी... प्रस्थापित परिमाणांची उलथा पालथ करणा-या, शुभाशुभ निकष उधळून लावणा-या या युगामध्ये स्त्रीच्या 'धरे' सारख्या उदार, उदात्त, क्षमाशील, सृजनशील, निर्माणकारी, शक्ती हुंकाराचा हा शब्द प्रसव वाचकांच्या दरबारी एक शुभ संकेत ठरावा हीच अपेक्षा! ... शुभं भवतु ... - डॉ. उमेश दत्त कळेकर • पुस्तकाचे नाव - मी धरा होऊनी आले • कवयित्री - अॅड्. सौ. माधुरी श्रीकांत काजवे • प्रकाशक - डॉ. सुनील पाटील • प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर • पृष्ठे - 60 (कव्हर सह) मुल्य - 60/- • विषय - काव्यसंग्रह • संपर्क - 02322 225500, 9975873569 kavitasagarpublication@rediffmail.com