सम्राट अशोक लहानपणापासूनच जिज्ञासू आणि शूर होता. त्यामुळे त्याचे वडील सम्राट बिंदुसार शिकारीला जाताना त्याला नेहमी सोबत नेत असत. अशोकची आई राणी धर्मा त्याच्यावर खूप प्रेम करीत असे, पण त्याचा मोठा भाऊ सुशीम मात्र त्याचा तिरस्कार करीत असे.
अशोकाने आपले जीवन कधीही निष्क्रिय राहू दिले नाही आणि अतिशय दयाळूपणाने जनतेची सेवा केली. त्यामुळे राज्यातील जनतेने त्याला भरभरून प्रेम दिले. सम्राट अशोकाने एकीकडे आपल्या आजोबाच्या विस्तार नीतीचा अवलंब केला तर दुसरीकडे वडील बिंदुसाराच्या मैत्रीपूर्ण धोरणाचाही वापर केला.
अशोकाने कलिंगचे राज्य पुन्हा मौर्य साम्राज्यात विलिन करण्यासाठी प्रयत्न केले. कारण कलिंग आधीपासूनच मौर्य साम्राज्याचा भाग होता.कलिंगच्या राजाने मात्र अशोकाचा प्रस्ताव नाकारला आणि अशोकाला नाईलाजास्तव आपली तलवार उचलावी लागली. या युद्धामध्ये झालेल्या लाखो लोकांच्या मृत्यूमुळे अशोकाचे मन परिवर्तन झाले. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून मानव कल्याणाचे धोरण स्वीकारले.