भारतात वेळोवेळी जन्म घेऊन अनेक विचारवंतांनी सत्यशोधक वैदिक ऋषींची पंरपरा सातत्याने कायम ठेवली आहे. स्वामी विवेकानंद सध्याच्या काळात याच पंरपरेचे प्रतिनिधी होते. ते ब्रह्मचर्य, दया, करूणा इ. उदात्त गुणांचे मूर्तिमंत स्वरूप होते. त्यांच्यासाठी सर्व प्राणीमात्र परमेश्वराचा अंश होते. त्यांची तर्कशक्ती अद्वितीय होती. शिकागो येथील विश्व धर्म संमेलनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने अवघे विश्व मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर पाश्चात्य जगात अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली. त्यामुळे भारतीय वेदांचे वास्तविक स्वरूप जगासमोर आले आणि अनेक अमेरिकन तसेच युरोपिय त्यांचे शिष्य झाले.स्वामी विवेकानंद एका बाजूला सर्व धर्म समभावाचे प्रतिक होते, तर दुसरीकडे त्यांना आपण हिंदू असल्याचा अभिमानही होता.