मूर्ख कोल्हा, चतुर सरडा, भोंदू कावळा, दुष्ट सिंह, गरीब चिमणी, रूबाबदार कावळा अशा प्राणिसृष्टीच्या कथांतून आपली मने संस्कारित झाली आहेत. चांगल्या वाईटातला फरक ओळखणं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं, विकलांगांना मदतीचा हात देणं, आपत्कालीन परिस्थितीवर मात करणं, अशा कितीतरी गोष्टींचा नीतिबोध लोककथांतून आपल्याला मिळतो. संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचविण्याचे काम लोककथांनीच केले आहे. लोककथा जितक्या स्थानिक असतात तितक्याच विश्वात्मक असतात. तापीकाठच्या कथांतून खानदेशच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. तसेच, मानवी स्वभावाचे विविध नमुने आणि जीवनातल्या अनेक पेचप्रसंगांचे दर्शन या कथांतून घडते. त्यामुळे या कथा जेवढ्या खानदेशच्या तेवढ्या तुमच्या-आमच्या सगळ्यांच्या आहेत.