नोबेल पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या या कथासंग्रहातून जागतिक वाङ्मयाचे एक प्रातिनिधिक दर्शन घडते. आशिया, अमेरिका, युरोप, आफ्रिका या सर्व खंडांतल्या लोकजीवनाचे, मानवी स्वभावविशेषांचे, जीवनशैलीचे आणि मूल्यव्यवस्थेचे अनेक चढउतार या संग्रहातून अनुभवायला येतात. मैत्रीचे, शत्रुत्वाचे, व्यावहारिक डावपेचांचे, नैतिक पेचप्रसंगांचे आणि मानवी शहाणपणाचे अनेक नमुने या कथांतून आपल्याला भेटतात. संपत्तीची हाव, दारिद्रयाचा शाप, राजकीय व व्यावसायिक व्यवस्थांनी अवगुंठलेले मानवी संबंध यातून जी मानसिक द्वंद्वे निर्माण होतात, संवेदनांना हादरे बसतात ते देशकाल निरपेक्ष असतात याचा प्रत्यय या कथांतून येतो. एका अर्थाने वैश्र्विक संस्कृतीची परिक्रमाच या कथासंग्रहातून घडते. नोबेल पारितोषिक विजेत्या साहित्यिकाविषयी माहिती व त्यांनी लिहिलेल्या कथेचा अनुवाद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. आपण कोणत्या साहित्यिकाची गोष्ट वाचतो आहोत, हे यामुळे वाचकांना लक्षात येते. या पुस्तकाचे लेखक-संपादक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांना साहित्य अकादेमीचे अनुवादाचे पारितोषिक मिळालेले आहे.